#लोकमान्य_हेच_सार्वजनिक_गणेशोत्सवाचे_संस्थापक…

गणेशोत्सव जन्माची कहाणी सांगितली जाते ती अशी… सरदार खासगीवाले हे ग्वाल्हेरमध्ये गेले असताना त्यांनी राजदरबारातील गणेशोत्सव पाहिला. अशाच धर्तीवर पुण्यामध्येही उत्सव साजरा व्हावा, असा विचार त्यांनी मनात केला.लोकमान्य टिळक यांचीच त्या पाठीमागे प्रेरणा होती, हे त्यांनी अर्थात, खासगीवाले यांनी लिहून ठेवले आहे.पुण्यामध्ये परतल्यानंतर त्यांनी गणेशोत्सव या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील नामवंत आणि समाजामध्ये ऊठबस असलेल्या लोकांची बैठक बोलाविली. ती बैठक झाली शालूकर बोळातील भाऊसाहेब जावळे अर्थात, भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी. सरदार खासगीवाले यांच्यासह महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, नाना नारायण भोर, खंडोबा तरवडे, बळवंत नारायण कोकाटे, मामा हसबनीस, गंगाधर रावजी खैर, रामभाऊ बोधने, दगडूशेठ हलवाई आदी मंडळी त्यास उपस्थित होती.

उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्याचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा निश्चय या बैठकीमध्ये झाला. खासगीवाले १८८८ पासून उत्सव करीत होते. त्यांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचे ठरविले. पहिल्या वर्षी भाऊसाहेब रंगारी, सरदार खासगीवाले आणि गणपतराव घोटवडेकर यांनी गणपती बसवले. त्यानंतर हळूहळू उत्सवातील मंडळे वाढू लागली. पहिल्या वर्षी म्हणजेच १८९२मध्ये तीन जणांनी गणपती बसविले. लोकमान्य या बैठकीला उपस्थित नव्हते. लोकमान्य हे राष्ट्रीय नेते होते. फक्त गल्लीबोळापुरते किंवा पुणे शहरापुरते मर्यादित नव्हते. त्यामुळे कदाचित त्यांना त्या बैठकीस हजर राहता आले नसावे. तरीही उत्सवाला सार्वजनिक रूप देण्याच्या कल्पनेस त्यांचे स्पष्ट अनुमोदन होते आणि त्यांनी तसे केसरीच्या अग्रलेखात लिहिलेही होते. (अग्रलेखांचे अनेक संदर्भ गोखले साहेबांच्या लेखामध्ये अर्थातच, आहेत.)

#सांगायचा उद्देश असा, की पहिल्या वर्षी फक्त भाऊसाहेब रंगारी यांनीच गणपती बसविला होता, असे नाही तर सरदार खासगीवाले आणि गणपतराव घोटवडेकर यांनीही त्यावर्षी अर्थात, १८९२मध्ये गणपती बसविला होता. म्हणजेच तीन जणांनी हे महत्कार्य केले होते. कुणी एकट्या व्यक्तीने नव्हे. शिवाय सरदार खासगीवाले हे १८८८ पासून उत्सव साजरा करीत होते. ग्वाल्हेरच्या राजघराण्यातही हा उत्सव साजरा होत होता. कदाचित पेशव्यांच्या काळातही असा पद्धतीने राजघराण्यात उत्सव होत असावा. पेशवे हे स्वतः गणेशभक्त होते.

#त्यामुळे या प्रकरणी अधिक खोलात जाण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. कारण कितीही खोल खणले, तरीही एकच नाव समोर येते आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जे समोर येते आहे, ते ढळढळीत सत्य आहे. या संदर्भात ‘केसरी’चे माजी संपादक आणि लोकमान्य टिळक हा विषय कोळून प्यायलेले श्री. अरविंद व्यं. गोखले यांनी लिहिलेला एक सुंदर आणि अत्यंत समर्पक लेख… गोखले साहेबांनी लिहिलेल्या लेखामुळे गणेशोत्सवाचे जनक आणि लोकमान्य टिळक यांचे एकूणच व्यक्तिमत्व यावर स्पष्ट प्रकाश टाकला आहे. तो लेख खालीलप्रमाणे

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ब्रिटिशांसाठी ‘असंतोषाचे जनक’ ठरले असले तरी त्यांची ती ओळख कायमची रुढ झाली. ब्रिटिश गुलामगिरीचा त्यांनी केलेला कडवट विरोध असो वा हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची रोवलेली मुहूर्तमेढ असो, लोकमान्य टिळकांच्या लेखणीने स्वातंत्र्य चळवळीत वेळोवेळी प्राण फुंकले. तेव्हा, भारतीय राष्ट्रवादाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रवादाची सविस्तर मीमांसा करणारा हा लेख....

#लोकमान्य टिळकांवर ते ‘असंतोषाचे जनक’ असल्याचा आरोप लंडनच्या ‘टाइम्स’ मध्ये व्हॅलेन्टाईन चिरोल नामक वार्ताहराने केला. त्यांच्यावर टीका करायच्या हेतूने त्याने तसे म्हटले, पण तीच त्यांची खरी ओळख बनली. चिरोलने टिळकांची बदनामी करण्यासाठी ’फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ या शब्द प्रयोगाचा त्यांच्यासाठी वापर केला आणि इंग्रजांना सांगितले की, ’’टिळक हेच खरे तुमचे शत्रू आहेत आणि त्यांनी जो असंतोषाचा वन्ही पेटवला आहे, त्याने तुमची राखरांगोळी व्हायचा धोका आहे.’’ वॉल्टर रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांचे चाफेकर बंधूंनी केलेले खून असोत की, मुझफ्फरनगरमध्ये केनेडी मायलेकींचा झालेला खून, (खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्याकडून मारले जाणार होते चिफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड, पण तशाच बग्गीतून चाललेल्या मुझफ्फरपूर बार कौन्सिलचे प्रमुख प्रिंगल केनेडी यांच्या पत्नी आणि कन्या यांचा बळी गेला) किंवा टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना नाशिकमध्ये जॅक्सनचा झालेला खून, त्या सर्वांमागे असणारे टिळक या तीन अक्षरांचे व्यक्तिमत्त्व होते, असे या चिरोलने बिनदिक्कतपणे ‘टाइम्स’मध्ये छापलेले होते. त्याच ‘टाइम्स’नेही ’पुणेकर चित्पावनांचे प्रमुख’ असा उल्लेख करत त्यांच्याविरोधात अग्रलेख लिहिले. टिळकांमागे कायमचा ससेमिरा लावण्याचा हा उद्योग होता. पुण्यात सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक चर्चा हेतुत: करण्यात आली. तो वाद मुळातच निरर्थक आहे. गणेशोत्सवाचे जनकत्व कोणाकडे आहे, असे त्याचे स्वरूप होते. गणेशोत्सवाला यावर्षी १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने तो कसा साजरा व्हावा, हा मूळ विषय बाजूला ठेवून आम्हा पुणेकरांना वाद वाढवण्यात अधिक रस असतो. टिळकांनी गणेशोत्सव चालू केला, त्यापूर्वी एक वर्ष भाऊ रंगारी यांनी तो चालू केला असल्याने यंदाचे वर्ष १२५ वे नसून १२६ वे आहे हे मान्य करावे, असा मुद्दा भाऊ रंगारी यांच्या नावाने स्थापन झालेल्या मंडळाने पुढे आणला. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्वही टिळकांकडून काढून घेत अन्यत्र देण्याचा हा प्रयत्न आहे. भाऊ रंगारी यांनी स्थापन केलेल्या गणपतीच्या उत्सवात स्वत: टिळक हजर होते, असे प्रसिद्ध झालेले आहे. तथापि त्यांच्या त्या उत्सवाला तेव्हा सार्वजनिक रूप दिले गेले नव्हते. तसे पाहिले तर खासगीवाले आणि त्यांच्याही आधी ग्वाल्हेरच्या राजवाड्यात शिंदे सरकारांकडून गणपतीची प्रतिष्ठापना केली जात होतीच. तीच पाहून टिळकांना गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्याची कल्पना सुचली, असे त्यांनीच लिहून ठेवलेले आहे. ब्रिटिशांनी १९१८ मध्ये न्यायमूर्ती एस.ए. टी. रौलट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ’सीडिशन कमिटी’ने सादर केलेल्या अहवालाच्या पहिल्याच प्रकरणात आणि त्याच्या प्रस्तावनेत, ’’१८८३ मध्ये टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देत गणपती या देवाला रस्त्यावर आणले आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करायला प्रारंभ करून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजात क्रोध जागृत केला,’’ असे म्हटले आहे. त्यावेळी टिळकांनी लिहिलेले गणेशोत्सवाचे अग्रलेख वाचले तरी त्यांच्या त्या उत्सवामागे असलेल्या तीव्र भावनांचे अधिक स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता पडणार नाही. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्याच्या पुढल्याच वर्षी त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होते, ’गणपतीचा उत्सव’ (१८ सप्टेंबर १८९३) त्यात ते म्हणतात, ’’तथापि यंदा आम्हां मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हां सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादी औद्योगिक वर्ग यातील लोकांना यंदा विलक्षण रीतीचे सार्वजनिक स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी जी काही मेहनत घेतली ती केवळ अपूर्व आहे.’’ दिवसभर कामधंदा करून घरी आल्यानंतर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे व या दारूच्या पायी बायकापोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये अचकट-गाणी ऐकत बसणारे या सर्वांस निदान काही काळापर्यंत उपरती होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्रीगजवदनाच्या भजनपूजनात गेला, ही गोष्ट काही लहान सामान्य नाही.’’

टिळकांनी मुस्लिमांच्या विरोधात समाजाला संघटित करण्यासाठी हा उत्सव सार्वजनिक केला, असे म्हणणारे ब्रिटिश किंवा आजही त्यांना याच कारणासाठी नावे ठेवणारे घरभेदी यांनी तरी हा अग्रलेख मुळातून वाचण्याची आवश्यकता आहे. याच अग्रलेखात ते म्हणतात, ’’गेल्या पंधरा दिवसांपर्यंत पुण्याचे सर्व रस्ते रात्री मनुष्यांनी फुलून गेलेले असत. प्रत्येक पेठेला किंबहुना प्रत्येक आळीला एक एक सार्वजनिक गणपती बसविलेला असून, शक्यतेनुसार आरासही चांगली केलेली असे. ब्राह्मणांनी तर यथाशक्ती वर्गणी दिलीच, परंतु विशेषत: लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की, प्रत्येक सार्वजनिक गणपतीची खटपट व भजनपूजनाचा थाट मराठे बंधूंकडून झाला आहे. कोतवाल चावडी, रे-मार्केट, शालूकराचा बोळ, रविवार, भाजीआळी, शुक्रवार, मेहुणपुरा, गणेशपेठ येथील गणपतीच्या मूर्ती खरोखरच प्रेक्षणीय होत्या. मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मती गुंग झाली. श्रावण महिन्यात जातां-एखाद-गाणे कानावर येई; त्यावरून पुढे जो अश्रुतपूर्ण चमत्कार दृष्टीस पडणार त्याची आम्हांस बरोबर कल्पना करितां आली नाही, हे आम्ही प्रांजलपणे कबूल करितो.’’

शेवटी त्यांनी जे म्हटले आहे त्याचा उल्लेख केला नाही तर ते योग्य होणार नाही. ते म्हणतात, ’’मही पर्वणी साधण्यास मुख्य म्हणजे ब्राह्मण आणि मराठे यांचा जो एकोपा आहे तो आहे तसाच राहिला पाहिजे. इतकेच नव्हे तर, हल्लीच्या सज्ञान काळात तो वृद्धिंगतही होत गेला पाहिजे. ब्राह्मण लोकांची निंदा करून ब्राह्मण व इतर हिंदू यांमध्ये फूट पाडण्याची खटपट ही पहिली नाही. अशा खटपटी पूर्वी पुष्कळ वेळा झाल्या, परंतु ब्राह्मणांनी आपला शांतपणा व दूरदर्शीपणा कायम ठेवल्यामुळे त्या सर्व वायां गेल्या.’’ या अग्रलेखात त्यांनी आपण हा उत्सव कोणत्या कारणाने सुरू केला त्याचे कारण स्पष्ट केले आहे. ‘‘मुस्लिमांच्याडोळ्यापुढे हिंदूंनी नाचावे किंवा कसे, कारण त्यातून त्यांच्या हृदयास काही पाझर फुटत नाही आणि कत्तली चालूच राहतात, १८९१ आणि १८९२ साली या प्रश्नांचा जोर दुणावला. प्रभासपट्टण, मुंबई, येवले वगैरे ठिकाणांचे वर्तन पाहून नागपंचमीला व ज्ञानोबाच्या पालखीच्या वेळी जे अंतराय झाले, या सर्वांवरून त्यांनी आपल्या देवादिकांच्या भजनपूजनाचा थाट पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू केला. यांत मुसलमानांस चीड येण्यासारखे त्यांनी काय केले हे कोणी शांतपणाने समजून घेऊन आम्हांस सांगेल काय?,’’ या शब्दांत त्यांनी उत्सवामागे असलेल्या कारणांची मीमांसा केली आहे.

पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची जी परंपरा आहे तीत विसर्जन मिरवणुकीचीही एक शिस्त आहे. अमुक एक गणपती शिस्त मोडून पुढे आला, अशी तक्रार जेव्हा खुद्द टिळकांकडे करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी अमुक एक गणपती आपला आणि तमूक आपला नाही, अशी तक्रार करण्यात अर्थ नाही, सर्वच गणपती आपले आहेत, असे त्या तक्रार करणार्‍यास बजावले, हे या ठिकाणी विसरता येत नाही, म्हणूनच रांग मोडून आलेल्या गणपतींंबाबत पुढेही कोणी तक्रार केलेली नाही. (वर्षांपूर्वीपर्यंत पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभी मानाचे पहिले तीनच गणपती होते. तिसरा गणपती हा गायकवाड वाड्याचा होता. सांगायचा मुद्दा हा की, आज जे वाद निर्माण केले जात आहेत त्यात राष्ट्रवादाचाच बळी दिला जात आहे.

टिळक जेव्हा अजून ‘लोकमान्य’ म्हणून ओळखले जात नव्हते, तेव्हाही त्यांनी जनतेचेच प्रश्न हाती घेतलेले होते. त्यांनी ९ ऑगस्ट १८९२ च्या ’’इंग्रजी राज्यांत आम्हांस फायदा काय झाला?’’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. त्या अग्रलेखातून इंग्रजी राज्याचे फायदेच अधिक सांगितलेले आहेत, असाच कोणाचाही समज होईल, पण शांतता, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, शेतकी सुधारणा आदींचा त्यात त्यांनी उल्लेख केला असला तरी त्यातच एक मेख आहे. इंग्रजी राज्यकर्त्यांनी आमच्या सल्ल्याने राज्य कारभार चालवावा, अशी जनतेची अपेक्षा असेल तर त्यात गैर काहीही नाही, असेही लिहिलेले आहे. त्यावेळी सुशिक्षितांचा एक वर्ग आणि अल्पशिक्षितांचाही एक वर्ग असा होता की, त्यांना इंग्रजी सत्तेने केलेल्या सुधारणांनी भारावून टाकले होते. आगगाडी आली, टपालाची चांगली सोय झाली, रस्ते झाले, तारयंत्रणा कार्यान्वित झाली आणि हे सर्व इंग्रजी राज्यकारभाराने केले, ही त्यांची समजूत होती. टिळकांनी त्या फुगलेल्या फुग्याला हळूच टाचणी लावली. इंग्रजांनी या सर्व सुधारणा का केल्या तर त्यांना भारतात व्यापारउदीम करण्यास चांगल्या सोयी हव्या होत्या आणि आपल्या देशातल्या मालाला सर्वदूर नेऊन त्याच्या विक्रीतून झालेला नफा त्यांना इंग्लंडमध्ये घेऊन जायचा होता म्हणून त्यांनी या सुधारणा आपल्याला देऊ केल्या, त्यात त्यांचाच जास्त फायदा झाला, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी २४ जानेवारी १८९३ रोजी लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होते, ’’आमच्यावर जुलूम कसा होतो?’’ त्या अग्रलेखात त्यांनी म्हटले आहे की, ’’लोकांवर जुलूम होण्यास केवळ शेतकी हेच एकमेव खाते आहे, असे नाही. जंगल, मीठ, अबकारी, कालवे, देवी, रजिस्ट्रेशन, शाळा, पोलीस आणि गावसफाई यांनी रयतेस भंडावून सोडले आहे. तोळाभर मीठ अगर खारी माती काढीन म्हटले तर सरकारचा शिपाई उभा आहेच! शेताबाहेर जरा गुरे गेली की, जंगलच्या अधिकार्‍याकडे खेपा घालून दंड भरून त्यांची सुटका करून घ्यावी लागते. दारूची दुकाने त्यांच्या घरात व बाजारात बसविली जातात. इंग्रज सरकारच्या सर्व सत्तेचा मूर्तिमंत अवतार जो पोलीसचा शिपाई तो यमदूतासारखा त्यांच्या डोळ्यांसमोर नाचत असतो. अशा स्थितीत कोणत्याही राजाच्या रयतेस कधीतरी सुख होईल की काय याचा लोकांनीच अजमास करावा, अशी सर वेडरबर्न यांची विलायतच्या लोकांस सूचना आहे. पूर्वीच्या राज्यांतून हे सर्व अधिकार रयतेकडे असत. जंगलांची, ताडामाडाची, गायरानांची, पोलिसांची, मिठाची व आरोग्यरक्षणाची सर्व व्यवस्था जेथल्या तेथे आपआपल्या सवडीप्रमाणे व गरजेप्रमाणे जे ते तेथे लक्ष ठेवित असत; पण आता ती सर्व व्यवस्था जेथल्या तेथे आपआपल्या इंग्रज सरकारने बदलून टाकून मीठ देण्याचा, झाडे राखण्याचा व दारू पाजण्याचा आपणाकडे मक्ता घेतला आहे ! आणि हा मक्ता चालवतेवेळी सरकार आपल्या तिजोरीकडे काय ते लक्ष पुरवते.’’

टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून घेतलेली अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. गांधीजी भारतात येण्यापूर्वी बराच काळ आधी मीठाविषयीच्या जुलूमशाहीकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले होते, ही वस्तुस्थिती आहे. गांधीजींविषयी अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेल्या पहिल्या मराठी चरित्राला प्रस्तावना लिहिण्याची विनंती लोकमान्यांना करण्यात आली होती आणि त्यांनीही ती मान्य केली आणि इंग्लंडला जाण्याची घाई असतानाही ही प्रस्तावना लिहून दिली. नुसती दिली असे नाही तर त्यांची ही प्रस्तावना त्याच्या शीर्षकापासूनच वाचनीय झालेली आहे. ’गांधीजींच्या चारित्र्याचे मर्म’ असे त्याचे शीर्षक असून ती १६ मार्च १९१८ रोजी लिहिलेली आहे. ही प्रस्तावना त्यांना अवंतिकाबाईंनी लिहायची गळ कलकत्ता येथे आधीच्या वर्षी डिसेंबरात पार पडलेल्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या काळात केली होती. त्याचा उल्लेखही टिळकांनी प्रारंभीच केला आहे. ते लिहितात, ’’गांधीजींच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा इतर मतांपैकी काही मते किती एकांस कदाचित पसंत होणार नाहीत. विद्वत्तेने त्यांना मागे टाकणारे दुसरे पुष्कळ गृहस्थ असतील, पण शील-चारित्र्याची महती वर सांगितली, त्या दृष्टीने विचार केला असता, महात्मा गांधी यांचे चरित्र खरोखरच सामान्य मनुष्यांस आदर्शभूत होण्यासारखे आहे, त्याबद्दल काही मतभेद असेल किंवा होईल, असे आम्हांस वाटत नाही आणि म्हणूनच मराठी भाषेत झालेल्या त्यांच्या प्रस्तुतच्या चरित्राचा महाराष्ट्रातील लोकांनी नीट अभ्यास करावा अशी आमची त्यांस शिफारस आहे.’’

गांधीजींच्या नि:प्रतिकाराचे महत्त्वही किती मोठे आहे ते त्यांनी याच प्रस्तावनेत नमूद केले आहे. ते लिहितात, ’’परंतु, गांधींच्या या अडवणुकीच्या मार्गाचे रहस्य सांगण्यास आणखी दोन शब्द सांगितले पाहिजेत. देशात शांतता राखण्यासाठी जे कायदे केलेले असतात, त्यात राज्यकर्त्या अंमलदाराशी दांडगाई करणे अगर त्यांचा हुकूम तोडून बंड करणे या गोष्टी कितीही सद्बुद्धीने केलेल्या असल्या, तरी स्वभावत: बेकायदेशीर मानल्या जातात. अशा वेळी ज्या देशभक्तास आपली इच्छित सुधारणा कायदेशीर रीतीने अंमलात आणावयाची असेल त्याच्या मार्गात अनेक अडचणी उत्पन्न होतात. मन जळत असते. सुधारणा करण्याची उत्कट इच्छा असते. कायद्याच्या मर्यादेचे उल्लंघन करणे गैरशिस्त होय, अशी खात्री असते, पण उपाय सुचत नाही. गांधी यांनी स्वीकारलेला नि:प्रतिकाराचा,अडवणुकीचा, किंवा त्यांच्या भाषेत बोलावयाचे, तर सत्याग्रहाचा मार्ग अशा प्रकारच्या अडचणीतच त्यांस सुचलेला असून त्यांनी अनेक अडचणी सोसून त्या मार्गांचा अवलंब केल्यामुळे तो आता शास्त्रपूत झाला आहे. हा मार्ग सर्व प्रसंगी सर्व काली अवलंबिण्यासारखा असला तरी तो हरएक उपयोगात आणावयाचा किंवा नाही अगर सर्व प्रसंगी तितकाच फलदूप होईल किंवा नाही हे निश्चयाने सांगणे कठीण आहे. तथापि त्या मार्गाची योग्यता मोठी आहे, हे सर्वांस कबूल करावे लागेल.’’ टिळकांच्या मनाचा मोठेपणाच यातून अधिक दृगोच्चर होतो. त्यांनी आपल्या प्रस्तावनेच्या शेवटी तर हे चरित्र सर्वांनी का वाचले पाहिजे तेही स्पष्ट शब्दांत मांडले आहे. त्यातच त्यांनी गांधीजींचा उल्लेख ’महात्मा’ असा केला आहे.

टिळक हे आंतर्बाह्य प्रामाणिक आणि पारदर्शी होते. त्याविषयी कितीतरी उदाहरणे देता येतील. नामदार गोखले यांच्याशी त्यांचे जे मतभेद होते ते मुख्यत: स्वराज्यासाठी जहाल मार्ग अवलंबायचा की मवाळ, त्यावरून होते. दोघेही आपआपल्या मतांचा आग्रह धरायचे आणि एकमेकांची उणीदुणी काढायचे? तरीही दोघांना परस्परांविषयी कमालीचा आदर होता. आजच्या असहिष्णुतेच्या चर्चेत ही गोष्ट प्रत्येकानेच लक्षात ठेवली पाहिजे. गोखले यांच्या ’सर्व्हंटस् ऑफ पीपल सोसायटी’च्या आर्यभूषण छापखान्यात काही काळ ‘केसरी’ छापला जात असे. त्यांची मते आपल्याला परवडणार नाहीत, हे लक्षात घेऊन गोखले यांच्या समर्थकांनी ‘केसरी’ला छापखान्याच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर काही काळाने त्याच छापखान्यात छापल्या जाणार्‍या आणि नामदार गोखले यांचा कडवा समर्थक असलेल्या ‘ज्ञानप्रकाश’मध्ये एक प्रसंग असा आला की, त्या दैनिकास आपला अग्रलेख वेळेत मिळू शकेल की नाही, याची चिंता वाटू लागली. त्यांचे व्यवस्थापक हरिपंत गोखले टिळकांकडे गेले. त्यांना टिळकांनी कारण विचारले. गोखले यांनी टिळकांना ’’एक काम होतं आणि आमच्यावर गुदरलेल्या संकटातून वाचण्याचा मार्ग केवळ आपणच दाखवू शकाल, या आशेने मी आपल्याकडे आलो आहे,’’ असं सांगितलं. ’ज्ञानप्रकाश’च्या अंकात वापरला जाऊ शकेल, असा अग्रलेख त्या दिवशी काही कारणवश नव्हता. म्हणजे ‘ज्ञानप्रकाश’च्या संपादकीय विभागात त्या दिवशीचा अग्रलेख लिहिणारे कोणी नव्हते. ’’दादा तेव्हा तुम्हीच आम्हाला यातून वाचवू शकाल असे वाटल्याने मी आलोय,’’ असे हरिपंत गोखले यांनी टिळकांना सांगितले. तेव्हा टिळकांनी कोणतेही आढेवेढे न घेता ’’अर्ध्या-पाऊण तासाने परत या,’’ असे त्यांना सांगितले. हरिपंत तसे आले आणि त्यांच्या हाती टिळकांनी अग्रलेखाचा लखोटा ठेवला. वास्तविक आर्यभूषणने ‘केसरी’ला जसा रस्ता दाखवला, तसाच हरिपंतांना टिळकांकडून दाखवला गेला असता, तर त्यात वावगे असे काही नव्हते. टिळकांनी तो लिहिला. हरिपंतांनी त्यांच्यासमोर तो लखोटा उघडला नाही. ते खाली गेले आणि सायकलवर टांग मारण्यापूर्वी त्यांनी अगदी थरथरत्या हातांनी तो उघडला आणि पाहतात तो काय, त्यांचा स्वत: डोळ्यावर विश्वास बसेना. तो अग्रलेख टिळकांनी ’ज्ञानप्रकाश’च्या संपादकांच्या शैलीत लिहिला होता आणि तो ‘ज्ञानप्रकाश’च्या परंपरेत बसणारा म्हणजेच स्वत:वरटीका करणारा होता. जागतिक पत्रकारितेच्या इतिहासात हे असे उदाहरण कोठेही सापडणार नाही.

टिळकांची पारदर्शकता तसेच संपादकीय शिस्त ही इतकी वाखणण्याजोगी होती. लोकमान्यांना १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेल्या सहा वर्षांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेला कारणीभूत झालेल्या एकूण आठ लेखांपैकी पाच अग्रलेख होते आणि त्यातले तीन हे कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकरांचे होते. तीनपैकी दोन स्फुट सूचनाही खाडिलकरांच्या होत्या (टिळक, खंड-, राजकीय लेखसंग्रह) टिळक त्या काळात संपादक होते आणि संपादकाच्या जबाबदारीचे त्यांना पूर्ण भान होते. वयाच्या ३७व्या वर्षी टिळकांनी लिहिलेल्या ’राजधर्माचे नवे उपदेशक-बीज काय?’ या अग्रलेखाचे उदाहरण पाहू. हा अग्रलेख आहे मुंबईत दादाभाई नौरोजी यांच्या झालेल्या भव्य सत्काराविषयी लिहिलेला. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून गेलेल्या दादाभाईंविषयी टिळकांच्या मनात अतिशय पूज्यबुद्धी होती. ’’स्वार्थाकडे लक्ष न देता सतत परिश्रम करत राहणे हे दादाभाईंचे वैशिष्ट्य आहे,’’ असेही त्यांनी म्हटले आहे. पण त्यांच्यासारखे एकदोनजण तिथे जाऊन या देशातल्या लोकांचे कल्याण होणार नाही, असाही त्यांचा युक्तीवाद होता.हे लिहित असतानाच ते म्हणतात, ’’राणी सरकारच्या राज्याखाली हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र शांततेची ध्वजा फडकत आहे हे खरे; पण ही शांतता राखण्यास आमच्या भाकरीपैकी निम्मी भाकर राज्यकर्ते व त्यांचे व्यापारी बंधु यांस दरवर्षी द्यावी लागत असल्यामुळे आम्ही उत्तरोत्तर कंगाल होत चाललो आहोत व ही स्थिती कायम राहिल्यास मग आमचे पुढे होणार तरी काय? याची विचारी मनुष्यांस धास्ती वाटू लागली आहे. पूर्वीच्या काळी हिंदू, मुसलमान, शीख यांपैकी कोणाच्याही मनांत असले विचार आले असता जो तो आपआपल्या जातीपुरते पहात असे. परंतु, तसा विचार हल्ली आपणांस करिता येत नाही, इतकेच नव्हे तर कोणी करूही देणार नाही. आमच्या राज्यकर्त्यांचे सामर्थ्य इतके जबर आहे की, वर सांगितलेल्या जातींपैकी कोणाचाही निरर्थक शिरजोरपणा ते चालू देणार नाहीत. सर्व जातींच्या व धर्मांच्या लोकांस जे काय करणें असेल ते त्यांनी एकदिलानेच केले पाहिजे. मग कोणाचे सामर्थ्य कमी असो किंवा कोणाचे जास्त असो, तो भेद लक्षात घ्यावयाचा नाही. इंग्रजी राज्याने हिंदुस्थानातील सर्व जातींच्या लोकांची एक मोठी मोळी केली आहे व त्या मोळीचा बंध तुटून पुन्हा त्यांतील लाकडे निरनिराळी होऊ नयेत अशी व्यवस्था करण्याचे सामर्थ्यही त्यांच्यात आहे. ब्रिटिश राज्यामुळे आम्ही एकत्र झालो, ब्रिटिश लोकांनीच आम्हांला एकत्र होण्यास शिकविले, असे जे ऑनरेबल मिस्टर दादाभाई नौरोजी वरचेवर उद्गार काढतात त्यांतील रहस्यही हेच होय.’’ दादाभाईंना काय वाटते ते सांगताना टिळकांनी वस्तुस्थिती काय आहे, त्याचे दिग्दर्शन अगदी सहजपणे केले आहे.

टिळकांचा राष्ट्रवाद हा अस्सल देशी होता. त्यात कोणताही अहंभाव नव्हता. आपल्या देशाचे दुर्दैव असे की, त्याकडे पाहणारे आजच्या घटकेलाही वेगळ्या चष्म्यातून पाहात असतात. त्यांना लावले जाणारे निकष हेही आजच्या पातळीवरचे असतात. ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत असताना त्यांनाही अशा अनेक अडथळ्यांना ओलांडून जावे लागले होते. महाराष्ट्रातल्या काही जातीवंत नेत्यांनी तर ‘‘आम्हाला स्वराज्यच नको, कारण ते टिळकांना पाहिजे आहे,’’ अशा तर्‍हेचा अत्यंत मूर्खपणाचा वाद घातला होता. विठ्ठल रामजी शिंदे यांनी असा स्वराज्याला आडवे जाणार्‍यांचे बुरखे टरकावले होते. १९१४ नंतर टिळकांमध्ये झालेला बदल क्रांतिकारक होता. ’’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’’ अशी घोषणा करताना त्यांनी लखनौत जे सांगितले ते महत्त्वाचे आहे.

लखनौ कॉंग्रेसच्या त्या अधिवेशनात टिळक म्हणाले होते की, ’’आम्हाला ब्रिटिश सांगतात, तुम्ही आर्यांचे वंशज आहात, तुम्ही या भूमीचे खरे मालक नाही.’’ आम्ही आर्यांनी इथल्या मूळ वंशाच्या लोकांकडून हा देश घेतला. त्यानंतर मुस्लिमांनी या देशावर आक्रमण करून तो आमच्याकडून काबीज केला. मुस्लिमांकडून, मराठ्यांकडून इंग्रजांनी तो घेतला. अर्थातच इंग्लिश राज्यकर्ते हे अनार्यांच्या या भूमीचे पालक होतात. ठीक आहे, मी त्यांचा हा युक्तीवाद मान्य करायला तयार आहे, पण मग ते या भूमीचे सध्याचे रक्षणकर्ते आहेत, तर त्यांनी ही भूमी सोडून भिल्ल, गोंड आणि आदि द्रविडआदी कोणाही आदिवासी, दलित यांच्या ताब्यात परत द्यावी आणि मुख्य म्हणजे येथून तातडीने चालते व्हावे. या भूमीचे जे मूळ मालक आहेत, मग भले ते कोणत्याही जातीधर्माचे असोत, पंथाचे असोत; त्यांची सेवा करायला आम्ही आनंदाने तयार आहोत. ब्रिटिशांना ’चले जाव’ असे बजावणारे ते पहिले नेते होत.

लखनौमध्ये लोकमान्यांकडून ही घोषणा केली जाताच सभागृहात प्रचंड जल्लोष झाला, टाळ्या तर एकसारख्या वाजतच राहिल्या. लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या वर्मावरच नेमका घाव घातला होता. त्याचा आनंद गगनाशी स्पर्धा करत होता. टाळ्यांचा कडकडाट कमी व्हायची थोडीशी वाट पाहून त्याच टीपेला गेलेल्या आवाजात लोकमान्य म्हणाले, ’’होमरूल (इज माय बर्थराइट ऍण्ड आय शॅल हॅव इट’’ सर्व सभागृह प्रचंड आवाजाने दुमदुमून गेले, एक क्षण तर असा निर्माण झाला की, मांडव कोसळतो की काय असेच अनेकांना तेव्हा वाटले होते. लोकमान्यांनी स्वराज्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. परकियांकडून तसेच स्वरकियांकडून टीकाही सहन केली. ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधात सर्वतोपरी आक्रमक भूमिका घेतल्या. तथापि लोकमान्य डगमगले नाहीत. टिळकांनी गोहत्त्येच्या विरोधात भूमिका घेतली आणि हा मुद्दा जिथे रेटायचा तिथे रेटला. मुस्लीम लीगच्या लाहोर प्रांतिक अधिवेशनाला ते हजर राहिले होते. त्या सभेत बोलताना त्यांनी, ’’हिंदूंच्या घरातून ओढून काढल्या जाणार्‍या गायींबद्दल आणि भररस्त्यात त्यांना मारले जाण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्या सभेत हजर राहिलेले मोहम्मद अली जिना यांनी लगेचच मुस्लीम समाजाला हिंदू सणांच्या दिवशी तरी गोहत्त्या टाळा, असा सल्ला दिला आणि लगेचच तसा ठराव संमत करवून घेतला. आज त्या ठरावाचे काय झाले ते कळायला मार्ग नाही, पण लोकमान्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की त्यासाठी झपाटल्याप्रमाणे काम करायची त्यांची पद्धत पाहिली म्हणजे आपण नतमस्तक होतो. इंग्लंडमध्ये १९१८ मध्ये स्वराज्याचा प्रचार करायला गेलेल्या टिळकांना जेव्हा, ’’समजा, आजच तुम्हाला स्वराज्य दिले गेले तर तुम्ही कोण होणार? परराष्ट्रमंत्री की पंतप्रधान?’’ असा सवाल करण्यात आला तेव्हा टिळकांनी त्या प्रश्नकर्त्याला नम्रपणे सांगितले की, ’’स्वराज्य आज मिळाले, तर मी फर्ग्युसनमध्ये जाईन आणि परत गणित विषय शिकवायला घेईन.’

Post a Comment

0 Comments