कम्युनिस्ट साम्यवादाचे सामान्य स्वरूप आणि मार्क्सच्या तत्त्वज्ञानातीलअपुरेपणा !
१. कम्युनिझम
१ अ. कम्युनिझमचा उगम : ‘कम्युनिझमच्या संबंधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्याचा उगम शुद्ध जिज्ञासेमध्ये अथवा सत्य ज्ञानाच्या तळमळीने नाही, तर तो तीव्र असंतोष आणि सूडबुद्धी यांतून झाला आहे.
१ आ. कम्युनिझमची उत्पत्ती कशी झाली ? : कम्युनिझमचे प्रणेते ज्यू होते. ‘बोल्शेविकांचा गुप्त उगम’ (Secret Origin of Bolshevism) या पुस्तकात दर्शवल्याप्रमाणे ‘धनवान यहुदी लोकांनी त्यांचा छळ करणार्या लोकांच्या विरुद्ध केलेल्या गुप्त अथवा उघड चळवळीतून बोल्शेविझम पोसला गेला’, असे वाटण्याइतका इतिहासात देखावा आहे, एवढे खरे ! परंतु हे जरी बाजूस ठेवले, तरी पूर्वी सांगितल्याप्रमाणे भांडवलशाही, यंत्रयुग आणि ख्रिस्ती धर्माचा तुटपुंजेपणा यांमुळे उत्पन्न झालेल्या संतापापासून कम्युनिझमची उत्पत्ती झाली, ही गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही.
२. अन्य तत्त्वज्ञान
२ अ. सत्य शोधनाची जिज्ञासा असलेले शंकराचार्य : शंकराचार्य आणि गौतम बुद्ध हे दोघेही महापुरुष जगत्कल्याणाच्या दृष्टीनेच कार्य करत होते. शंकराचार्यांच्या विचारात सत्य शोधनाची जिज्ञासा अधिक होती; म्हणून तर्काचा हात जेथपर्यंत पोहोचेल, तेथपर्यंत बुद्धी चालवून तत्त्वज्ञानाची उभारणी करणे त्यांना शक्य झाले.
२ आ. कम्युनिस्टांच्या १० – १५ वर्षांच्या इतिहासावरून काढलेले अनुमान : आचारधर्म या दृष्टीने नागार्जुनाचा महायान अथवा असंगाचा वज्रयान हे वैदिक धर्माची जवळजवळ नक्कलच होते. तशीच गोष्ट कम्युनिस्टांचीही होणार, असे गेल्या १० – १५ वर्षांच्या इतिहासावरून म्हणता येईल. विवाहाला प्रोत्साहन देणे, कुटुंबसंस्था उन्नत करून तिला स्थिर करण्याची आवश्यकता वाटणे, ‘प्रोकोव्होस्की’ (prokovosky) कम्युनिस्ट साच्याचा इतिहास टाकून देऊन नवीन इतिहास सिद्ध करणे इत्यादी गोष्टी याच्याच द्योतक आहेत.
२ इ. मार्क्स तत्त्वज्ञानाची तीन अंगे : तत्त्वज्ञान म्हटले, म्हणजे जीव आणि जगत् यांची वास्तविक स्वरूपे काय ? त्यांचे परस्परसंबंध काय ? त्यांचे उत्पत्ती, स्थिती आणि लय कशा रितीने होतात ? मनुष्य अन् बाह्य सृष्टी यांच्यात उपभोग, उपभोक्ता असा भेद का असावा ? त्यात ज्ञान आणि इच्छा यांनी युक्त असे नवीन कर्म करण्याची शक्ती केवळ माणसांतच का असावी ? मनुष्याच्या ठिकाणी जी ज्ञानशक्ती आहे, तिचा अर्थ कसा काय ? सर्वच जगामध्ये चित् अन् जड असा भेद दिसतो का ? मानवी जीवन कशाकरता आहे ? इत्यादी अनेक प्रश्न त्यात आहेत. त्यामुळे साहजिकच त्या तत्त्वज्ञानाचे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीन भेद पडतात. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचेही असे तीन भेद आहेत. ज्याला तो विरोध विकासात्मक जडवाद (Dialecticl Materialism) म्हणतो, ते त्यातील अध्यात्म होय. ज्याला तो विरोध विकासात्मक इतिहासवाद (Historrical Materialism) म्हणतो, ते त्यातील आधिदैव आहे आणि (Economic Materialism) हे त्याचे आधिभौतिक आहे.
२ इ १. मार्क्सने वापरलेली पद्धत – बुद्धीवर भर न देता, सुंदर रितीने एखादे तत्त्वज्ञान न मांडता समोरच्या व्यक्तीच्या केवळ भावनांना हात घालणे : मार्क्सने आपल्या तत्त्वज्ञानाला ‘Dialectical’ म्हटले आहे, तेही लक्षात ठेवण्याजोगे आहे. ‘Dialectical’ ही ग्रीस देशातील एक विशेष प्रकारची वादपद्धती होती आणि तिचा भर आपले काही सुंदर रितीने मांडण्यापेक्षा दुसर्याला तर्काने कुंठित करून ‘आता तू कुंठित झाला आहेस, तर आमचे म्हणणे स्वीकार’, असे म्हणण्याकडे अधिक होता. मार्क्सने तरी ‘जीव आणि जगत् यांच्या कोड्यासंबंधी मानवी हृदयाचे काही समाधान होईल, असे स्पष्टीकरण केले आहे’, असे नाही. गौतम बुद्धाप्रमाणेच त्याची पद्धत आहे. त्यासंबंधी कोणी प्रश्न विचारला असता ‘त्याचा विचार करून तुला काय करायचे आहे ? आजचा तुझा प्रश्न दुःख दूर करण्याचा आहे’, असे म्हणून ‘त्याचा विचार कर, म्हणजे झाले’, असे म्हणून त्याच्या भावना जागृत करण्यासाठी त्या दुःखाचे रसभरित वर्णन त्याच्यापुढे करणे, हाच त्याचा मार्ग होता. मार्क्सवादी लोकही जवळजवळ हेच करतात; मात्र इतकेच की, हे आम्ही पूर्ण विचारांती म्हणत आहोत, हे दाखवण्याकरता वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही अंगांनी युक्त असे आपले तत्त्वज्ञान तो मांडतो.
२ इ २. मार्क्स आणि गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानातील भेद : त्यांच्यात आणि गौतम बुद्ध यांच्यात एक मोठा भेद आहे. गौतम बुद्ध भारतीय परंपरेतील असल्यामुळे ते ‘व्यक्ती’ला केंद्र धरून विचार करतात. मार्क्सला तत्त्वज्ञान उडवून द्यायचे असल्यामुळे ‘व्यक्ती’ हा आरंभ धरणे सोयीचे पडत नाही; म्हणून तो समाज हा आरंभ धरतो आणि मग आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ‘व्यक्ती म्हणजे काय ?’, याचे स्पष्टीकरण करू पहातो. त्यात मजेशीर गोष्ट अशी आहे, ‘समाज’ या आरंभाचा विचार मात्र व्यक्तींतूनच निघतो.’ त्यामुळे त्याची अवस्था थोडी विचित्र झाली आहे. मार्क्सवादी ‘व्यक्तीचा विचार करत नाहीत’, असे म्हटले की, त्यांना राग येतो. असे म्हणणे हा मार्क्सचा विपर्यास आहे. ‘मनुष्याचे जीवन केवळ अर्थमय आहे. त्यात दुसरा काही विचारच नाही’, असे मार्क्सचे म्हणणे नाही. ‘मानवी जीवनाचे अंतिम निर्णायक अर्थोत्पादन असते, एवढेच आमचे म्हणणे आहे’, असा ते बळाने निषेध करतात. (According to the materialistic concepts of History, the determining element in the History is ultimately the production and reproduction in real life’ मार्क्स एंजेल यांची पत्रे) आणि उलट आपत्तीत सापडतात; कारण वरील म्हणणे व्यक्तीच्या दृष्टीने सर्वथैव खरे नाही. अर्थोत्पादन हे नुसते अंतिम निर्णायक नसते. ते म्हणजे अप्रत्यक्षपणे, इतकेच नाही, तर पुष्कळ वेळा अज्ञातपणेसुद्धा निर्णायक होते. ही एक गोष्ट दृष्टीआड केल्यामुळे मार्क्सवाद्यांनी आपल्या साच्यांत प्राचीन इतिहास ओतण्याचे जे प्रयत्न केले आहेत, ते व्यर्थ होतात.
३. भ्रामक युक्तीवाद
मोठ्या व्यक्ती स्वत:चे जीवन तत्त्वनिष्ठपणे जगतात. ते तत्त्व ठरवण्यालाही अप्रत्यक्षपणे ‘अर्थ’ काही कारण झाले असेल; म्हणून ‘सर्व व्यवहार अर्थमूल आहे’, असे म्हणणे म्हणजे, ‘पृथ्वीच्या पोटातून सारा संसार उत्पन्न होतो आणि पुन्हा पृथ्वीच्याच पोटात गडप होतो; म्हणून सोने अन् हिरे यांपासून सर्व धर्माचे आद्य साधन जे शरीर, ते टिकवण्यास खावे लागणारे अन्नसुद्धा मातीच आहे’, असे म्हणण्यासारखे आहे. हा वेदांत अर्थात्च व्यवहारात आणलेला कोणास खपणार नाही.
४. कम्युनिस्ट चतुःसूत्री
आता कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाच्या मुख्य चतुःसूत्रींचा विचार करू.
अ. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचे विरोधात्मक द्वंद्व (Thesis + Antithesis)
आ. यांच्या विरोधातून एक नवी प्रक्रिया (Synthesis)
इ. समाजाच्या गतीप्रमाणे या ओघाचा पुन्हा प्रध्वंस (Negation)
ई. गुण परिमाणांचे संख्या परिमाणांत रूपांतर आणि संख्या परिमाणांचे गुण परिमाणांत रूपांतर (Quality changes into Quantity and vice Versa)
‘ही चार तत्त्वे नुसती सामाजिक घटनांनाच लागू आहेत’, असे त्यांचे म्हणणे नसून ‘जगातील सर्व जडचैतन्यात्मक व्यापार याच तत्त्वाप्रमाणे चालत असतात आणि प्रत्येक घटनेच्या मुळाशी असे विरोधात्मक द्वंद्व असते’, असे त्यांचे म्हणणे आहे. उदा. ‘विद्युत् शास्त्रातील धन आणि ऋण विद्युत् अथवा गणितशास्त्रात बेरीज अन् वजाबाकी ही मूळ द्वंद्वे आहेत’, असे लेनिनच्या ग्रंथात म्हटले आहे. ही विरोधात्मक द्वंद्वे आहेत, यांत संशय नाही.
जग हे विरोधावर अधिष्ठित आहे, हे म्हणणेही भारतीय शास्त्रास धरून आहे; परंतु ‘विरोधविकासास कितपत धरून आहे’, याविषयी मला स्वतःला शंका आहे. बेरीज आणि वजाबाकी यांच्या उपयोगानेच सर्व गणितशास्त्र बनले आहे, यात काहीच संशय नाही. याच्या एकामागून एक अशा क्रमवार उपयोगाने गणित बनले आहे. विरोधातून एक नवी प्रक्रिया (Synthesis) उत्पन्न होऊन गणितशास्त्र बनले आहे, असे नाही अथवा या दोघांच्या उपयोगाने येणार्या फलाचा प्रध्वंसही (Negation) गणितशास्त्रात नाही.
५. युरोपमधील तत्कालीन तत्त्वज्ञानाची अवस्था आणि मार्क्सचेे तत्त्वज्ञान
५ अ. युरोपमध्ये तत्त्वज्ञानाची वाढ केवळ व्यवहार निरपेक्ष अशा पंडिती जिज्ञासेतून झाल्याने कम्युनिस्टांनी ‘भाकरीचे तत्त्वज्ञान हेच खरे तत्त्वज्ञान’, असा अपूर्ण सिद्धांत मांडणे : कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान समजण्यास युरोपमधील तत्कालीन तत्त्वज्ञानाची अवस्था लक्षात घेणे आवश्यक आहे. युरोपमध्ये तत्त्वज्ञानाची जी वाढ झाली, ती केवळ व्यवहार निरपेक्ष अशी पंडिती जिज्ञासेतून झाली. या तत्त्वज्ञानाची मनुष्याच्या व्यवहाराशी संपूर्ण सांगड कधीच घातली गेली नाही. अशा प्रकारचे व्यवहार निरपेक्ष (Abstract) तत्त्वज्ञानसुद्धा मनुष्याचे समाधान करू शकत नाही. आपल्या अॅन्टिड्युहरिंगमध्ये (Anti-Duhring) एंजेल्सने तत्त्वज्ञानावर हल्ला चढवला आहे, त्याचे रहस्य हेच आहे. मनुष्यापुढे भाकरीचा प्रश्न असतो आणि भारतीय कल्पनेप्रमाणे जीवनाचे कोडेही त्याला सोडवायचे असते. या दोहोंची सांगड ठेवून विचार सांगणारे तत्त्वज्ञान त्याला पटते. आरंभी तो केवळ भाकरीचा विचार करतो हे खरे, तरी थोडा प्रौढ झाल्यावर त्याला जीवनाचे कोडे सोडवण्याची तहान लागतेच. कम्युनिस्ट लोक या तहानेकडे डोळेझाक करत असल्यामुळे अथवा ‘ती तहान दडपून टाकायची’, असाच त्यांचा उद्देश असल्यामुळे जरी ‘ते व्यवहार निरपेक्ष असे तत्त्वज्ञान उपयोगाचे नाही. भाकरीचे तत्त्वज्ञान हेच खरे तत्त्वज्ञान’, असा अपूर्ण सिद्धांत मांडत.
(संदर्भ : मासिक ‘प्रज्ञालोक’, डिसेंबर २०१६)
कालच्या लेखात आपण कम्युनिझम, त्यांचा भ्रामक युक्तीवाद, युरोपमधील तत्कालीन तत्त्वज्ञानाची अवस्था आणि मार्क्सचेे तत्त्वज्ञान, तसेच अन्य तत्त्वज्ञान यांविषयी पाहिले. आज त्या पुढचा भाग पाहूया.
मार्क्सचा अपुरेपणा
पदार्थविज्ञान शास्त्रास आज जे स्वरूप आले आहे, त्या दृष्टीनेही मार्क्सवादाचे गौणत्व लक्षात ठेवले पाहिजे. गेल्या २० ते २५ वर्षांत या प्रांतात जे आश्चर्यकारक परिवर्तन झालेे, त्याचे दर्शन मार्क्सला होणे अशक्यच होते. तरी आपण त्याचा विचार केला पाहिजे. आता पदार्थविज्ञान शास्त्र असे म्हणत आहे, ‘जगात जड असा पदार्थच नाही, केवळ गती तेवढी आहे ‘The tendency of modern physics is to reduce the whole universe into waves. (Mysterious Universe)’ आणि त्यामुळे कित्येक शास्त्रज्ञ ‘सर्वकाही चैतन्यमयच आहे’, असेही म्हणू लागले आहेत.
५ आ. जडवाद आणि काल्पनिक अध्यात्मवाद : युरोपमध्ये विशेषतः दोन विचारप्रवाह प्रबळ होते. या दोन्ही प्रवाहांचे क्षेत्र बुद्धीजीवी वर्ग हेच होते. बुद्धीजीवी क्षेत्रातील हे दोन प्रवाह म्हणजे भौतिकशास्त्र विज्ञात्यांचा केवळ जडवाद (Materialism) आणि ज्याला साधारणतः तत्त्वज्ञान म्हटले जाते, तशा प्रकारचा काल्पनिक अध्यात्मवाद (Meta Physics) हे होत. पहिल्या वर्गातील लोकांचे म्हणणे असे होते, ‘जग हे केवळ मोठे यंत्र असून मनुष्याचे नुसते जीवनच तर काय; पण त्यांचे मानसिक, बौद्धिक आणि भावनामय अस्तित्व एखाद्या जड यंत्रातील निरनिराळ्या गतिमान अवयवांच्या क्रिया-प्रतिक्रियांप्रमाणे केवळ यांत्रिक खेळ आहे.’ याचा अर्थ असा की, मनुष्याला जे आपले व्यक्तीत्व भासत असते, तेच मुळी खरे नसून त्याच्या जीवनाला काही अर्थ असणेही शक्य नाही.
५ इ. मार्क्सचे पुढे पाऊल : शुद्ध बुद्धीचे घोडे नाचवण्यापेक्षा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला काही जास्त साधायचे असल्यामुळे मनुष्याचे क्षणिक जीवन व्यर्थ ठरवणे त्यांना सोयीचे नव्हते. त्या जीवनाचे क्षणिक अस्तित्व का होईना, सत्य ठरवून ‘जीवनाला काही हेतू आहे’, असे प्रतिपादण्याची आवश्यकता होती; म्हणूनच मार्क्सने त्याच्या विचारसरणीला तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचा उद्योग केला. या दृष्टीने पाहिले, तर त्याचे तत्त्वज्ञान युरोपच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे केवळ स्वतंत्रपणे वाढलेले नाही, ते घडवलेले आहे, तरीसुद्धा ‘युरोपच्या तत्कालीन विचारसरणीच्या पुढे एक पाऊल टाकून ते उभे आहे’, ही वस्तूस्थिती आहे. भारतीय तत्त्वज्ञान स्वतंत्रपणे वाढले असले, तरी ‘जग काय आहे’, यापेक्षा ‘कोऽहं’ चा प्रश्न सोडवण्याच्या तळमळीतून वाढले असल्यामुळे त्याची जशी व्यवहाराची वेळोवेळी सांगड बसत आली आहे, तसा प्रकार ‘मार्क्स’ तत्त्वज्ञानाचा होणे शक्यच नाही.
५ ई. आर्थिक जडवाद ? : ‘मनुष्य जीवनाला हेतू नसून ते केवळ यंत्र आहे’, असे म्हटले, म्हणजे त्या जडवादाला भाकरीचेही महत्त्व असण्याचे कारण नाही. इतर जडवादातून मार्क्सचा वेगळेपणा दाखवण्याकरता त्याच्या तत्त्वज्ञानातीलआधिभौतिकाला ‘आर्थिक जडवाद (Economic Materialism)’ ही मुद्दाम वेगळी संज्ञा योजली आहे. त्याचे कारण हेच आहे.
५ उ. मार्क्स आणि कुमारील : केवळ तात्त्विकांमध्ये त्या काळी विशेषतः हेगेलला जास्त मान्यता होती. कुमारिल भट्टाने ज्याप्रमाणे जैनांच्या जवळ अध्ययन करून त्यांच्या विचारसरणीच्या तलवारीनेच त्यांना कापून काढले, असाच प्रकार मार्क्सचा झाला आहे. मात्र इतकेच की, कुमारिलच्या अत्यंत विशुद्ध आणि कोमल अशा भारतीय अंतःकरणाला सद्हेतूने केलेला का होईना; पण हा विश्वासघात सहन झाला नाही. त्याच्या हृदयातील दैवी संपत्तीच्या तेजाने त्याला अग्नीकाष्ठे भक्षण करायला लावून प्रायश्चित्त दिले. मार्क्ससारख्यांना तसा पश्चात्ताप होण्याचे कारणच नव्हते. उलटा उन्माद येणेच साहजिक होते.
५ उ १. श्रीमदभगवद्गीतेत केलेले असुरांचे वर्णन !
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोक ७
अर्थ : आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत.
त्याचप्रमाणे ‘उग्रकर्माणः, म्हणजे ‘क्रूरकर्मी पुरुष’, ‘कामोपभोगपरमाः’, म्हणजे ‘विषयभोग भोगण्यात तत्पर असणारे’, ‘आशापाशशतैर्बद्धा:’ म्हणजे ‘आशेच्या शेकडो जाळ्यांत गुरफटलेले’ आणि ‘जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं’, म्हणजे ‘आसुरी प्रकृती असणारे म्हणतात की, जग हे ईश्वरावाचून आपोआपच केवळ स्त्री-पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न झाले आहे.’
गीतेमध्ये असुरांचे असे वर्णन केले आहे आणि मार्क्सच्या मताला ते तंतोतंत लागू पडते, यात काय शंका आहे ?
५ ऊ. हेगेल : हा जडवादी नव्हता. मनुष्याचे सर्वच अस्तित्व कल्पनामय असे म्हणणारा (Idealist) होता.
५ ए. जड आणि अजड : तत्त्वज्ञानाविना मानवी हृदयाचे समाधान होणार नाही; म्हणून मार्क्सने जे तत्त्वज्ञान उत्पन्न केले, त्यालाही त्या विषयांतील मुख्य कोडी सोडवल्याचा आव आणावा लागलाच. या जगतात काही वस्तू आपल्या इच्छेने हालचाल आणि काहींच्या ठिकाणी स्वतःची इच्छाच दिसत नसल्याने त्यांना दुसरीकडून प्रेरणा मिळवावी लागते, म्हणजेच या जगतात जड-अजड असे दोन प्रकार आहेत, हे स्वयंसिद्ध आहे. मार्क्स तत्त्वज्ञानाप्रमाणे म्हटले, तर हेही एक विरोधात्मक (Dialectical) कोडेच आहे. यालाच इंग्रजी भाषेत ‘मॅटर आणि एनर्जी (Matter and Energy)’ असे म्हणतात. ‘असे दोन प्रकार का असावेत ?’, याचे उत्तर एका भारतीय तत्त्वज्ञानाविना तर्कशुद्ध रित्या कोणीच देत नाही. याविषयी मार्क्स तत्त्वज्ञानाची धारणा अशी की, मूलतः सर्व जड वस्तूच (Matter) आहे आणि जड गतीमान आहे, हेच काय ते प्राथमिक सत्य.
५ ऐ. संवित् (Consciousness) विषयी मार्क्सची धारणा : आपल्या विचाराचा आरंभबिंदू ‘समाज’ हा ठेवल्यामुळे या प्रश्नाला कशीबशी बगल देऊन मार्क्सवाद्यांनी वाट काढली आहे. व्यक्तीच्या संवित्पेक्षा त्यांनी व्यक्तीच्या संवित्चा जो एक भाग, म्हणजे व्यक्तीची ‘समाजभावना (Social Consciousness)’ म्हणतात, तिचाच विचार जास्त केला आहे; कारण त्यांचा सिद्धांत असा आहे, ‘ही संवित् म्हणजे केवळ बाह्य व्यवहाराची मेंदूरूपी यंत्रात उमटलेली छाया असल्यामुळे ती बाह्य व्यवहारावर म्हणण्यासारखा परिणाम करू शकत नाही. मार्क्स म्हणतो, ‘The mode of producton, in general determines the Social, Intellectual and Political processess’, ‘Thye Consciousness of human being does not determine these things, but conversly they determine it.’ (समाप्त)
0 Comments