कौन बनेगा राष्ट्रपती’च्या नामावलीत वेगवेगळ्या पक्षांनी विविध क्षेत्रातील नावे पुढे केली. पण ‘सर्जिकल स्ट्राईक’चा मास्टर स्ट्रोक देण्यात एक्स्पर्ट असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या नावाने ‘चला राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार मिळाला’ याचा आनंद काही जणांना झाला, तर ‘जातीपातीच्या राजकारणात आपणच खरे मागास’ असे भूषण मानणार्या, स्वत:ला मागास समाजाचे कर्ताधर्ता समजणार्या राजकीय पक्षांची ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ अशी बिकट अवस्था झाली. या सर्व परिस्थितीला कारणीभूत ठरले रालोआने घोषित केलेले राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद... पण कोण आहेत हे रामनाथ कोविंद ?
रामनाथ कोविंद हे बिहारचे राज्यपाल आहेत. अर्थात सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे याचे काही संकेत असतात. त्या संकेताच्या परिक्षेपात रामनाथ कोविंदांची व्यक्तिरेखा सुयोग्य होती. भाजपचे केवळ दोन खासदार असताना, भाजपचे राजकीय सत्तेच्या आयामातून पूर्ण पानिपत झाले असताना, जे नेते भाजपच्या संघटनात्मक उत्कर्षासाठी झटले, त्या कर्मठ आणि निष्ठावान कार्यकर्त्या नेत्यांच्या यादीत रामनाथ कोविंद पुढच्या फळीत आहेत. भाजपच्या ’अच्छे दिना’ची स्वप्न पाहत ज्यांनी भाजपसाठी ’वो सुबह कभी तो आयेगी’चे आशादायक चित्र निर्माण केले, त्यात रामनाथ कोविंदही एक होते. दोनदा राज्यसभेचे खासदार, भाजपचे प्रवक्ते आणि भाजपच्या अखिल भारतीय अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे ते अध्यक्षही राहिले आहेत. रामनाथ कोविंद यांची भाजपशी असलेली बांधिलकी सांगण्याचे कारण हेच की, भारतीय जनता पक्षाच्या ’राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष त्यानंतर सर्वात शेवटी मी’ हे ब्रीदवाक्य अत:पासून इतिपर्यंत रामनाथ कोविंद यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची प्रेरणा राहिले आहे.
रामनाथ कोविंद यांच्या नावाला भाजप त्यातही पंतप्रधान मोदींनी पसंती का दिली, यावर तर सध्या सगळीकडेच संशोधन सुरू झाले आहे. पण याचे उत्तर सोपे आहे, ‘‘राज्यघटना ही माझ्यासाठी गीता आहे,’’ असे म्हणणारे आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी भीम ऍप आणणारे मोदी हे संघाच्या मुशीतून आलेले रत्न आहेत. त्यामुळे ’नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ मानून या मातृभूमीच्या सर्वात्मक कल्याणासाठी काय काय करावे लागेल याचे आत्मभान त्यांना आहे, हे सांगायची गरजच नाही. त्यामुळे रामनाथ कोविंदसारखी सर्वोच्च न्यायालयात १६ वर्षे वकिली केलेली व्यक्ती, जिला घटनेचे पूर्ण ज्ञान आहे, जिला कायदा सुव्यवस्था आणि देशातील सर्वच घटनात्मक पदांची पूर्ण जाण आहे, जी व्यक्ती राजकारण एके राजकारण करत स्वतःचा स्वार्थ साधत न बसता, देशाच्या कल्याणाचा विचार करेल त्याच व्यक्तीचा विचार मोदींनी रामनाथ कोविंदच्या रूपात केला, हेच खरे आहे.
दुसरे असे की, सध्या एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय. त्यांच्या एकात्म मानवतावादाचे अंत्योदय हे मार्गदर्शक तत्त्व. अंत्योदय म्हणजे सर्वात अंत्य स्तरावर असलेल्या व्यक्तीचा विकास. या अंत्योदयाची मूर्त कल्पना म्हणजे भारतीय समाजात तथाकथित जातीपातीच्या श्रेणीत मागास म्हणून समजल्या जाणार्या कोरी जातीचे प्रतिनिधित्व करणार्या व्यक्तीला राष्ट्रपतीच्या नामांकनात आणणे होय. ‘मी शेतकर्याचा मुलगा किंवा मी शेतकरी आहे’ अशी हाकाटी पिटत समाजाची दिशाभूल करत लबाड राजकारणी महाराष्ट्राला तरी नवीन नाहीत. पण रामनाथ कोविंद हे कानपूरच्या छोट्या गावातल्या खरोखरच्या शेतकर्याचे सुपुत्र आहेत. शेतकर्यांचे, बहुजन समाजाचे जगणे त्यांनी अनुभवले आहे. आता कोणी म्हणेल, मागास समाजाचा त्यातही शेतकर्याच्या मुलाला राष्ट्रपती बनवणे म्हणजे जातीपातीचे राजकारण आहे (कोणी म्हणायला कशाला हवे? नामांतराला विरोध करणार्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टच म्हटले की, ‘‘दलित मतांसाठी भाजपने राष्ट्रपतिपदासाठी दलित व्यक्तीचे नाव पुढे केले आहे, त्यात शिवसेनेला रस नाही.’’) आता, भाजपने सवर्ण समाजाच्या लायक व्यक्तीचे नावही राष्ट्रपतिपदासाठी दिले असते तरी हेच लोक बोंबलत सुटले असते, ‘बघा बघा भटा बामणांचा पक्ष... यांना बहुजन समाज तोंडी लावायला पाहिजे.’ आता बहुजन समाजाचा लायक उमेदवार दिला आहे, तर पुन्हा यांची गटारगंगा सुरूच. असो, काहीही असले तरी ’भूल से भी मुख मे जातीपंथ की ना बात हो, संघटन गढे चलो सुपंथ पर बढे चलो,’’ असे सामूहिक गीत प्रमाण मानणार्या भाजपची ही खरोखर समरस भूमिका आहे की रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निवडले. याबाबत नेहमी ‘प्रस्थापित’ आणि ‘आहे रे’ गटाच्या विरोधात दाखवून स्वतःला ’गरिबांचा मसिहा’ स्वतःच समजणार्या तृणमूलच्या ममता बॅनर्जींचे विधान बोलके आहे. रामनाथ कोविंद यांचे नाव ऐकून या गरिबांच्या ‘नाही रे’ गटाच्या मसिहा म्हणाल्या, ‘‘कोण रामनाथ कोविंद? यांचे तर मी नावही कधी ऐकले नाही. कुणा मोठ्या व्यक्तीचे नाव तरी भाजपने राष्ट्रपतिपदासाठी द्यायचे होते.’’
रामनाथ कोविंद यांच्या नावाला भाजपमध्ये सर्वानुमते एकवाक्यता आहे. कारण, कधीही प्रसिद्धीची, मोठ्या पदांची हाव न धरता रामनाथ कोविंद यांनी मनस्वी समाजसेवा केली. सदासर्वकाळ प्रसिद्धीझोतात राहावे, असे चुकूनही त्यांनी प्रयत्न केले नाहीत. ते जनता सरकारच्या कालावधीत मोरारजी देसाईंचे सचिव होते. त्यानंतर समाजासाठी काम करणार्या वेगवेगळ्या भूषणावह उच्च समित्यांवरही ते कार्यरत होते. नेहमी आक्षेप घेतला जातो की, मागास समाजातली व्यक्ती उच्च पदावर गेली की बहुतेकांची समाजाशी नाळ तुटते. पण या आक्षेपाला रामनाथ कोविंद एक सणसणीत चपराक आहेत. कारण, मोठमोठ्या पदावर गेल्यानंतरही ते पिचलेल्या, अन्यायग्रस्त समाजाच्या हक्कासाठी, कल्याणासाठी कार्यमग्न राहिले. अन्यायग्रस्त, मग तो कोणत्याही समाजाचा असू दे, त्याच्यासाठी ते आजही विनामूल्य वकिली करतात. लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मॅनेजमेंट बोर्डाचे ते सदस्य आहेत. कुष्ठरुग्णांसाठी काम करणार्या हरिद्वारच्या ’दिव्यप्रेम सेवा मिशन’ या संस्थेचे ते आजीवन संरक्षक आहेत. गोमांसाची बढाई करत नेहमी सातवे आसमान पर असलेल्या ममता बॅनर्जींना रामनाथ कोविंद कोण हे माहिती नसतील, पण सामाजिक क्षेत्राशी जोडलेल्यांना रामनाथ कोविंद हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. असो, या सर्व प्रकरणात माकपच्या सीताराम येचुरींचे विधानही पाहा. त्यांचे म्हणणे, ‘‘रामनाथ कोविंद यांच्या विरोधात उमेदवार उभा करायलाच हवा. कारण, रामनाथ कोविंद हे संघ शाखेचे शिक्षक होते. ते स्वयंसेवक आहेत. विचारांची टक्कर आहे. त्यामुळे रामनाथ कोविंदांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा करणारच!’’ येचुरी असे म्हणाले, त्यात भीतीचे प्रतिबिंब आहे. कारण एक संघ स्वयंसेवक पंतप्रधान असताना आपल्या तद्दन असंकुचित विचारधारेचे हाल कुत्रेही खात नाही आणि आता जर राष्ट्रपतीही संघ स्वयंसेवक झाला तर...तर मग विचारता सोय नाही. तसे पाहिले, तर रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे नेहमीचे कौशल्य मोदींनी दाखवले आहे, असे राजकीय चाणक्यांना वाटते. पण, शोषित समाजाच्या, वंचित समाजाच्या उत्थानाची सकारात्मक भूमिका घेणार्यांना मात्र रामनाथ कोविंद म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन त्यातही सर्वच बाबतीत मागे राहिलेल्या समाजाला दिलेल्या ’शासनकर्ते बना!’ या मूलमंत्राच्या स्वप्नाचे वास्तव वाटत आहे.
मेरा देश बदल रहा है|
मेरा समाज बदल रहा है|
0 Comments