#थोरले_बाजीराव_पेशवे
बाजीराव पेशवे जसे स्वकीयात माननीय होते, तसेच त्यांची योग्यता परकीय लेखकांनाही पटलेली होती. सर रिचर्ड टेम्पल ह्या इंग्रजी लेखकाने बाजीराव पेशवे यांच्याबद्दल असे लिहिले आहे की,
" बाजीरावच्या हाती राज्यसूत्रे आली, तेव्हा त्याला नानाविध अडचणींशी झगडावे लागले. वडिलांनी केलेला उपक्रम पुढे चालवून त्याला मराठी राज्याची वृद्धी व व्यवस्था करावयाची होती. निरनिराळे सरदार एकमेकांशी विरोध करीत, त्यांच्यात ऐक्य निर्माण करणे, मुसलमानाच्या (मोघल) ताब्यातील प्रदेश सोडविणे आणि हिंदूंची संघटना बनवणे ही महत्वाची कामे त्याला सिद्धीस न्यावयाची होती. ऐन वेळेवर ही कामे उरकाण्यास बाजीराव पुढे आला. ब्राह्मणांचे विशिष्ट गुण त्याच्या ठिकाणी भरपूर उतरले होते. तो स्वरूपाने भव्य व रुबाबदार, वर्तनाने प्रेमळ, भाषणाने आकर्षक, बुद्धीने कल्पक व तरतरीत आणि संकटात युक्तीबाज असल्यामुळे त्याला लगोलग यश येत गेले. सुंदर भाषण करण्याची कला त्यास चांगली साधल्यामुळे समरांगणावरील विजयानंतर तो आपल्या लोकास आणखी विजय मिळवण्यास हुरूप आणि.; पराभव झाला असला तर त्यांच्या मनोवृत्तीस पुनः चेव उत्पन्न करी. "
" अंगाच्या वरील गुणांपलीकडे त्याने बाह्य गुणही पूर्णपणे मिळवले होते. अश्वारोहण कलेत बाजीराव तर अत्यंत वरचढ होता. युद्धसंग्रामात तो सर्वांपुढे निर्भयपणे ठासून उभा राहत असे. सभोवार बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत असता तो कधी कचरला नाही. कष्ट करण्याची सवय त्याला भरपूर होती."
" सामान्य शिपायांप्रमाणे प्रत्येक काम तो स्वतः करी आणि त्याच्याच सारखे सामान्य अन्न खाण्यात आनंद मानी. त्याचे स्वार लांब लांब मजला मारीत तेव्हा घोड्यावरच्या पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खातखात दौड करीत. तशाच प्रकारचे फाके मारीत बाजीरावही प्रवास करी."
" त्याचा स्वराष्ट्राभिमान जबरदस्त असून त्यापुढे कोणत्याही अडचण तो जुमानीत नसे. ब्राह्मणाचे सोवळेओवळे व जातीचा कर्मठपणा मात्र बाजीरावचे अंगी बिलकुल उतरला नव्हता."
" त्याने मराठी सत्तेचा विस्तार सर्व हिंदुस्थानभर आरबी समुद्रापासून तो थेट बंगाल समुद्रापावेतो केला. मात्र त्याला धनोत्पादन करता आले नाही. त्याचा सारा जन्म जसा उन्हातान्हात उघड्या हवेत गेला, तसाच त्याचा मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात झाला."
"लढवय्या पेशवा अशी त्याची वाहवा महाराष्ट्रात अद्यापि होत असते. तो हिंदूंचा मोठा पुरस्कर्ता असून त्यास मृत्यूही एकाएकी अल्पायुष्यातच आला. उघड्या हवेचा जन्मभर झालेला त्रास त्यास सहन झाला नाही."
0 Comments