दूरदृष्टी कर्मवीर पू. गोळवलकर गुरुजी....

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकर यांची 5 जून रोजी 44वी पुण्यतिथी आहे. त्यांचा कार्यप्रवास उलगडणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उघडून दाखविणारे चरित्र रंगा हरीजी यांनी लिहिले होते. साप्ताहिक विवेकने पाच वर्षापूर्वी ते मराठीत अनुवादित करून 'गुरुजी गोळवलकर जीवनचरित्र' या नावाने प्रकाशित केले होते. श्रीगुरुजींच्या स्मरणार्थ याच पुस्तकातील काही अंश लेख स्वरूपात देत आहोत.

श्रीगुरुजी 5 ऑक्टोबरला रत्नागिरीला पोहोचले. तेथे त्यांना त्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळून असलेली अभिलाषा पूर्ण करायची होती, ती म्हणजे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचे दर्शन. राजीबडा येथून गौतमी नदी ओलांडून पावसला जावे लागते. तेथे अनंतनिवासामध्ये स्वामीजी राहत होते. कोणीही संत असला तरी त्याच्या दर्शनाने गुरुजींना अलौकिक आनंदाची अनुभूती होत असे. पण स्वरूपानंदांच्या दर्शनामागे त्यांची आणखी एक अंतःप्रेरणा कार्यरत होती. स्वामीजी नाथ संप्रदायाचे दीक्षित यतिवर्य होते. गुरुजींच्या मातोश्रींनीसुध्दा त्याच संप्रदायाची दीक्षा घेतली होती. गुरुजींसोबत बापूराव पटवर्धन, प्रांत संघचालक काशीनाथपंत लिमये, वसंतराव भिडे अाणि गोपाळराव देशपांडे ही मंडळी होती. पण स्वामीजींना भेटताना सोबत केवळ वसंतराव भिडेच होते. स्वामीजींनी गुरुजींना उच्च आसनावर बसायला सांगितले, पण गुरुजी त्यांच्यासमोर उभेच राहिले, बसले नाहीत. मंद स्वरांत दोघांचा संवाद झाला. स्वामीजींनी सवयीने स्वरचित ग्रंथ संजीवनी गाथा गुरुजींच्या हातात दिला. ग्रंथ उघडून पाहण्यास त्यांना सांगितले. ते होते पृष्ठ क्रमांक 123. त्यावर 120 क्रमांकाचे पद होते. स्वामीजींनी वाचायला सांगितल्यावर वसंतराव भिडे यांनी त्याचे वाचन केले. स्वामीजी व गुरुजी यांनी त्याचे श्रवण केले.

ते पद पुढीलप्रमाणे होते.

ध्येयासाठी जगूं, सोसू सुखदु:खें।

ध्येयासाठी सुखें, वेचू प्राण॥

सत्यासाठी मारूं, स्वार्थावरी लाथ।

लौकिकाचि मात, दूर ठेवूं॥

हरिसाठीं करूं, सर्वस्वाचें दान।

झुगारूं बंधन, अहंतेचे॥

स्वामी म्हणे मन, ध्येयीं समर्पून।

होऊंचि आपण, ध्येयरूप॥

गुरुजींच्या जीवनाबाबत ज्यांना माहिती आहे, असे सर्व जाणकार सांगतात की या ओळी गुरुजींसाठी अगदी उचित होत्या. ज्यांच्यावर दैवी वरदहस्त असतो, त्यांना त्यानुसार प्रसाद लाभत असतो.

गुरुजींनी स्वामीजींना चांदीची गणेशमूर्ती अर्पण केली. स्वामीजींनी प्रसाद म्हणून पुन्हा तीच गुरुजींच्या हातात ठेवली. गुरुजींनी ती कपाळाला लावून ग्रहण केली. स्वामीजींना नमस्कार करून सर्व जण तेथून परतले.

पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971च्या मध्यरात्री भारताच्या उत्तर-पश्चिम दिशेला असणाऱ्या विमानतळांवर बाँबफेक केली आणि दुसऱ्या भारत-पाकिस्तान युध्दाला प्रारंभ झाला. परंतु या गोष्टीची पूर्वतयारी म्हणूनच पाकिस्तानने अनेक महिन्यांपासून पूर्व पाकिस्तानात राहणाऱ्या बौध्द-ख्रिस्ती-हिंदू जनतेवर खोटे आरोप ठेवून त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा सपाटा चालविला होता. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 70 लाखांहून अधिक निर्वासित बांधव तेव्हा भारतात आलेले होते. गुप्त विभागाला मिळालेल्या माहितीनुसार याच काळात पूर्व-पश्चिम पाकिस्तानात भारतासोबत युध्द करण्याची तयारी जोमाने सुरू होती. अशा बिकट परिस्थितीत युध्दाची घोषणा होण्यापूर्वी 15 ऑक्टोबरला दिल्ली येथे लाला हंसराज यांच्या घरी सरकार्यवाह बाळासाहेब देवरस यांच्या अध्यक्षतेखाली सरसंघचालकांच्या उपस्थितीत केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्या बैठकीत आगामी संकट ध्यानात घेऊन जनतेला जागृत करून त्यांचे मनोबल अक्षुण्ण राखून या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांना सिध्द करावे अशा अर्थाचा ठराव संमत झाला होता. या ठरावात संघाचा बिनशर्त पाठिंबा देण्याचे व सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्र सरकारला देण्यात आले होते.

दिल्लीची बैठक आटोपल्यावर ठरावात नमूद केल्याप्रमाणे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुजी पश्चिमोत्तर सीमावर्ती भागात प्रवासाला गेले. 17 ते 20 ऑक्टोबर या काळात त्यांनी त्या क्षेत्रातील प्रचारकांच्या बैठकीत भाग घेतला. कोणत्याही परिस्थितीत संघाने नित्यसिध्द राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. तेथून ते 20-21 तारखेला पंजाबला गेले. अणीबाणीसारखीच परिस्थिती होती. यासाठी दिल्लीत 22 तारखेला एक अणीबाणीचे एकत्रीकरण आयोजित करण्यात आले होते. त्यात उपस्थित राहण्यासाठी गुरुजी पंजाबहून दिल्लीत परतले. मैदान खच्चून भरले होते. त्या एकत्रीकरणात गुरुजी म्हणाले, ''शत्रू चहू बाजूंना आहे. पूर्व-पश्चिम सीमेवर आपल्याच देशाचा लचका तोडून तयार झालेले जे शत्रुराष्ट्र आहे, ते आक्रमणाच्या तयारीत उभे ठाकले आहे.

याबाबतीत आपले नेते आपल्याला इशारे देत असतात. इशारे देणे तर ठीक आहे, परंतु आक्रमणाचे पारिपत्य करण्यासाठी व्यवस्था काय केली आहे, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. सैन्यशक्ती वाढविणे हा त्या व्यवस्थेतील एक भाग होय. आपल्या सैनिकांना चांगली शस्त्रे देऊन सुसज्ज करणे हा दुसरा भाग झाला.

सैन्यशक्ती आणि शस्त्रसज्जता या दोन बाबींबरोबरच तिसरीही आणखी एक बाब आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण समाजात राष्ट्ररक्षणाची भावना जागृत करून सुसंघटित असे सामर्थ्य निर्माण करणे, ही ती बाब आहे. यावर जर आपण विचार केला, तर संघकार्याचे माहात्म्य आपल्या चांगले लक्षात येईल.''

दिल्लीहून गुरुजी जम्मू-काश्मीरला गेले. जम्मूत त्यांनी विराट सभेला मार्गदर्शन केले. पण तेथील प्रतिपादन दिल्लीपेक्षा वेगळे होते. त्या तापलेल्या वातावरणात गुरुजींनी जो मुद्दा मांडला, तो देशातील अन्य कोणत्याही नेत्याने मांडलेला नव्हता. तो मानसशास्त्रीय मुद्दा होता. त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले, ''स्वतःला देशातील श्रेष्ठी म्हणविणाऱ्या लोकांच्या मनातही भीतीने घर केलेले आहे, हे नाकारता येणार नाही. त्यांना असे वाटते आहे की, जगात आता आपला कुणीच मित्र नाही. मनाच्या याच अवस्थेत त्यांनी रशियाशी करार केला आहे. जगात देशादेशात करार होणे तसे स्वाभाविकच आहे. म्हणून रशियाबरोबरच का, अन्य देशांशीही तहनामे होऊ शकतात. उद्या चीन जरी तह करावयास इच्छुक दिसला, तर त्याच्याबरोबर तह केला पाहिजे. परंतु मला ज्या गोष्टीचा खेद झाला ती ही आहे की, हा तह झाल्याबरोबर सर्व नेते आनंदाने नाचू लागले आहेत. सर्वत्र अशा घोषणा केल्या जात आहेत की आम्ही आता एकाकी राहिलो नाही. आम्हाला मित्र मिळाला. ज्या प्रकारे आम्ही रशियाशी तह केला, त्याचप्रकारे त्यानेही आपल्याशी तह केला आहे याचादेखील थोडा विचार करायला हवा. मग रशियातील लोक आपल्यासारखे आनंदाने बेहोश होऊन नाचत का नाहीत? असा तह झाला म्हणजे जणू काही दुनियेतील एक अघटित गोष्ट घडून गेली असे मानून लोक आनंदाने वेडे का होत आहेत? त्याचे कारण हेच आहे की, आपल्या देशाच्या आंतरिक शक्तीचा अनुभव आपल्याला कुठेच आढळून येत नाही. म्हणूनच नेतेमंडळींना वाटते की, एक मित्र आपल्याला लाभला हीच परमेश्वराची मोठी कृपा झाली. परंतु शक्तिशाली व्यक्तीची ही प्रतिक्रिया नव्हे. ही प्रतिक्रिया तर शक्तिहीन माणसाची आहे असेच समजावे लागेल.''

दिल्लीतून मग गुरुजी दक्षिण भारतात आले. केरळ प्रवासात त्यांनी स्वयंसेवकांना जागृत करीत म्हटले, ''हे संकट केवळ पश्चिमोत्तर आणि पूर्वोत्तर भागापुरतेच आहे असा विचार करणे चूक आहे. शत्रू मोकळया सागरकिनाऱ्यावरून शस्त्रसामग्रीची तस्करी करू शकतो, ही गोष्ट टाळता येणार नाही. त्यामुळे आपल्याला रात्रंदिवस सावध राहावे लागणार आहे.''

Post a Comment

0 Comments